News Magnet 24 

June 05, 2023

कुरखेडातील दोन वर्षांपूर्वीची घटना


गडचिरोली : शेतजमिनीच्या वादातून नातेवाईक महिलेला ठार मारणाऱ्या आरोपीस गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षांची सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आसाराम बिजाराम कुमरे (३५) रा. कोटलडोह ता.कुरखेडा असे आरोपीचे, तर तुळजाबाई मंगू कल्लो (६०, रा. मोहगाव, ता. कोरची) असे मृतक महिलेचे नाव आहे.



तुळजाबाई कल्लो ही घटनेच्या आठ दिवसांपूर्वी फिर्यादी अनुसया वासुदेव कुमरे रा. कोटलडोह ता. कुरखेडा, हिच्याकडे भेटण्याकरिता येऊन तिच्याकडेच राहत होती. घटनेच्या दिवशी दिनांक १८ जुलै, २०२१ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तुळजाबाई व आसाराम कुमरे यांच्यात शेतजमिनीच्या हिश्श्यावरून भांडण झाले. दरम्यान, आरोपीने तुळजाबाईला लाकडी पाटीने तिचे डोक्यावर, हाता-पायांवर व पाठीवर मारहाण केली. यात ती बेशुद्ध पडली. जमलेल्या लोकांच्या मदतीने तिला खाटेवर उचलून ठेवले, त्याच दिवशी अंदाजे सायंकाळी ५ वाजण्या सुमारास ती मरण पावली. तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा पोलिस यंत्रणेने कौशल्यपूर्ण तपास करून,आरोपीच्या विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने, न्यायालयात दोषारोप दाखल केले. फिर्यादी व इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून, ३ जून रोजी आरोपी आसाराम बिजाराम कुमरे याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांनी कलम ३०४ भाग-२ अन्वये सात वर्षांची सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.


सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील एस.यू. कुंभारे यांनी कामकाज पाहिले, तसेच गुन्ह्याचा तपास पोलिस स्टेशन पुराडाचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक दीपक अमोल शेळके यांनी केला


News Magnet Lite 24 ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/JnIsNIJ9qd46W4k6Dbksut